जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून, या धरणातून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो.
जायकवाडी धरणाला ‘नाथसागर’ नावानेही ओळखले जाते. संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीतील हे धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे. पैठणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या धरणाचा जन्म झाला. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधानांचे पाय या मातीला लागलेले आहेत. मराठवाड्याची तहान भागवणे, शेती फुलवणे, उद्योगधंदे वाढावे या उद्देशाने उभारलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता 102 टीमसी एवढी आहे.
नाथसागर जलाशयाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत 18 ऑक्टोबर 1965 रोजी झाले होते. 24 फेब्रुवारी 1976 साली नाथसागर जलाशय राष्ट्राला अर्पण करून करण्यात आले. त्यास आज (24 फेब्रुवारी 2020) 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, नाथसागर जलाशय निर्मितीसाठी आपल्या लाखमोलाच्या जमिनी दिलेल्या 118 गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना गेल्या 44 वर्षांपासून न्याय मिळालेला नाही. अनेक प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्यात आले नाही. राहण्यासाठी जागा मिळाली नाही, तर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली नाही तसेच ज्यांना जमिनी वाटप करण्यात आल्या आहेत त्यांना अद्यापही ताबा मिळालेला नाही. ताबा मिळण्यासाठी ते गेल्या 44 वर्षांपासून शासन दरबारी चकरा मारताना दिसत आहेत.आपल्या न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी आजही अनेक शेतकरी तालुका पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत हेलपाटे घालताना दिसतात. त्यांचा संघर्ष गेल्या 44 वर्षांपासून सुरूच आहे.
पैठणचे सुपुत्र व नाथसागर जलाशयाचे जनक तथा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत देशाच्या तत्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्या हस्ते नाथसागर जलाशय राष्ट्राला अर्पण करण्यात आले होते. नाथसागर जलाशय राष्ट्राला अर्पण करून 44 वर्षांचा कालावधी उलटलेला असताना आजही पैठण तालुक्यातील जनतेला घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच तालुक्यातील शेतकर्यांना या जलाशयाच्या पाण्याचा कोणताही फायदा मिळत नाही. पैठण तालुक्यात एकही मोठी सिंचन योजना पूर्ण झालेली नाही, ही शोकांतिका आहे. याला शासनाचा ढिसाळ कारभार तसेच पैठण तालुक्यातील राजकीय पुढार्यांचा दळभद्री कारभार कारणीभूत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
1522 फूट क्षमता असलेल्या जायकवाडी धरणात सन 1983 मध्ये 93.87 टक्के
धरणाची साठवण क्षमता : 102 टीमसी
धरणाचे पाणलोट क्षेत्र : 21750 चौरस किलोमीटर
एकूण जलसाठा : 2909 दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीसाठा : 2171 दशलक्ष घनमीटर
मृत पाणीसाठा : 738 दशलक्ष घनमीटर
जलाशयात बुडणारे क्षेत्र 3500 हेक्टर
जलाशयामुळे विस्थापित गावे : 118
पाण्याखाली येणारे शेतीचे क्षेत्र : 183322 हेक्टर